नवी मुंबईतील सरकारी – खाजगी रुग्णालयात निकृष्ट दर्जाची वैद्यकीय साहित्ये

अनंतकुमार गवई
नवी मुंबई / प्रतिनिधी :
राज्यात कोरोनाकाळात निकृष्ट दर्जाची वैद्यकीय साहित्ये वापरण्याची पुनरावृत्ती होत असल्याचे उघडकीस येत आहे. मुंबई, ठाणेनंतर आता नवी मुंबईमध्येदेखील काही खाजगी रुग्णालयात तसेच सरकारी रुग्णालयात निकृष्ट पीपीई संच तसेच निकृष्ट दर्जाचे मास्क आढळून आले आहेत. संपूर्ण देश कोरोनाने होरपळून निघत असतानाच दुसरीकडे काही रुग्णालये निकृष्ट दर्जाची वैद्यकीय साहित्ये वापरत राज्य सरकारच्या नियमांना केराची टोपली देत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अनेक रुग्णालयात निकृष्ट दर्जाचे वैद्यकीय साहित्य आढळून आल्याची कबुली दिली आहे. आरोग्यमंत्र्याची प्रतिक्रिया ताजी असतानाच नवी मुंबईतील वाशी येथील सिडको प्रर्दशन केंद्रात असा सदोष संच असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पुरविण्यात येत असलेल्या साहित्याचे लेखापरीक्षणची मागणी काही राजकीय पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे.कोरोनाकाळात नवी मुंबई पालिकेला हातमोजे, मुखपट्टी, जंतुनाशके, जेवण आणि औषधांचा विविध कंत्राटदारांमार्फत पुरवठा केला जात आहे. मात्र हे पुरवत असतानाच साहित्यांचा दर्जा तपासणे आवश्यक आहे. मात्र या कंत्राटदारांनी पुरवलेल्या वैद्यकीय साहित्य उत्पादनात दर्जा राखला नसल्याचे तज्ज्ञांच्या पाहणीनंतर उघडकीस आले आहे. दरम्यान, वाशी येथील सिडको प्रर्दशनी केंद्रातील कोरोना रुग्णालयात पीपीइ संच निकृष्ट आढळून आले. त्यामुळे हे साहित्य पुरवठा करणाऱ्या पुरवठादाराचे चौकशीचे आदेश पालिकेद्वारे देण्यात आले असल्याची माहिती आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे. याआधीही नवी मुंबईतील अनेक रुग्णालयात मास्क, ग्लोव्ह्ज निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट झाले होते.