महापालिका आरोग्य विभागातील सुधारण्यासाठी लवकरच वैद्यकीय उपायुक्त दर्जाचा अधिकारी नेमणार – आयुक्त बांगर

अनंतकुमार गवई
नवी मुंबई
नवी मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी झालेला नाही. दररोज वाढणारी रुग्णसंख्या आणि त्या तुलनेने अप्रभावी ठरलेली आरोग्य यंत्रणा यामुळे नवी मुंबईतील कोरोना रुग्ण अत्यावस्थ आहेत. याच पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आरोग्य विभागात सुधारणा करण्यासाठी विशेष कार्यक्रम आखला आहे. यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील उपायुक्त दर्जाचा अधिकारी लवकरच नियुक्त केला जाणार असून यांच्यामार्फत कोरोना रुग्णालयात काम करणाऱ्या खाजगी आणि पालिका कर्मचाऱ्यांना एकमेकांचे कामकाज जवळून पाहता येणार आहे. यासाठी काही खाजगी रुग्णालयात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
नवी मुंबईतील आरोग्य विभागावर गेल्या काही दिवसांपासून वारंवार बोट दाखवण्यात येत आहे. पालिकेच्या आरोग्य विभाग रुग्णांवर उपचार करण्यासाठी अथक प्रयत्न घेत असले तरी अनेक अनागोंदी कारभार देखील यादरम्यान करण्यात आला आहे. याबाबत अनेक तक्रारी रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक तसेच काही लोकप्रतिनिधींनी वारंवार आयुक्तांजवळ केल्या होत्या. मात्र कोणतेही प्रशासकीय वचक नसल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार रामभरोसे सुरू होता. मात्र आयुक्त बांगर यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत झाडाझडती घेतलेली आहे. यामध्ये आरोग्य विभागात सुरू असलेली गोंधळाची स्थिती आणि अनागोंदी संपविण्यासाठी लवकरच अनेक डॉक्टर आणि डॉक्टरेतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत असे आयुक्त बांगर यांनी सांगितले.
“आरोग्य विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून नवीन अधिकाऱ्याच्या हातात सूत्रे दिली जाणार आहेत. या विभागाचा स्वतंत्र कारभार व देखरेख ठेवण्यासाठी नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती लवकरच केली जाणार आहे. नवी मुंबईतील आरोग्य विभागाबाबत कोणतीही हयगय केली जाणार नसल्याचे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त – अभिजित बांगर यांनी सांगितले”.