भारतीयांच्या दान धर्म वृत्तीमुळे लॉकडाउन काळात कबुतरांचे झाले लाड कबुतरांची संख्या वाढल्यामुळे नागरिकांना गंभीर आजाराची भीती

अनंतकुमार गवई
मुंबई
गेले सहा महिने आपण सर्वजण कोरोना या महामारीशी लढत असून आजही ही लढाई सुरु आहे , भारतात लॉकडाउन झाल्यानंतर अनेक नागरिकांच्या नोकरी धंद्यावर गदा आली, अनेक नागरिक बेघर झाले मुंबई व जवळच्या महानगरातील भाड्याने राहणाऱ्या अनेक घरातील नागरिक आपल्या मूळगावी परतले त्यामुळे अशा खाली घरांच्या बाल्कनी तसेच व्हरांड्यामध्ये कबुतरांचा मुक्त संचार वाढू लागल्यामुळे अनेक नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावू लागल्या आहेत, कोरोना महामारीचे संकट टळण्यासाठी अनेक नागरिकांमध्ये दान धर्माची वृत्ती वाढीस लागली परंतु मंदिरे व इतर धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे अनेक नागरिक कबुतरांना धान्य देताना दिसत आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात कबुतरांनी ‘पोस्टमन’ची भूमिका निभावल्याचे सर्वश्रुत आहे. मात्र हीच कबुतरे अनेक गंभीर आजारांचे वाहक बनले आहेत,त्यांचे लाड जरा कमीच करा असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातून दिला जात आहे. याविषयी अधिक माहिती देताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरचे फुफ्फुसविकार तज्ञ डॉ अभय उप्पे सांगतात , “कबुतरांच्या विष्ठेत ‘हायपर सेन्सिटिव्ह निमोनाइटिस’ असतो. यामुळे लोकांना दमा, खोकला, श्वास भरून येणे अशा समस्या होऊ शकतात या आजारांवर वेळीच निदान आणि इलाज झाला नाही, तर हे घातक ठरू शकते, कबुतरांच्या पंखांतून निघणाऱ्या ‘फीदर डस्ट’मुळे लोकांमध्ये संवेदनशील न्यूमोनिया किंवा बर्ड फन्सियर्स लंग्स हे आजार वाढू शकतात. कबुतरे जेंव्हा एकत्र उडतात तेंव्हा जे धुलीकण उडतात ते सर्वात हानीकारक असतात , अनेक वेळा मोकळ्या जागी लहान मुले बसलेल्या कबुतरांना धावत जाऊन उडवतात अशावेळी जी धूळ उडते ते लहान मुलांमध्ये अस्थमा वाढविण्यास कारणीभूत ठरते कारण या धुळीमध्ये त्यांच्या पंखाची घाण असते. एका जागी १०० ते २०० कबुतरे असतात ती जागा सर्वात धोक्याची असते. लॉकडाउन नंतर अनेक नागरिक आपल्या घरी परतत आहेत अशावेळी बंद घरामध्ये जर कबुतरे राहत असतील तर ते घर संपूर्णपणे सॅनिटाईज करणे जरुरीचे आहे. नवजात बाळांना कबुतरांच्या संसर्गापासून दूर ठेवले पाहिजे.” कबुतरांच्या विष्ठेत असणाऱ्या असंख्य रोगाणूंमुळे माणसांना किमान ६० प्रकारचे आजार होऊ शकतात.कबुतरांची विष्ठा आणि पिसं यांच्यासोबत वाळलेल्या विष्ठेतून अस्परजिलस प्रकारची बुरशी निर्माण होऊन वेगवेगळ्या प्रकारच्या ऍलर्जी आणि धाप लागण्याचे प्रमाण वाढले आहे. कबुतरांची विष्ठा बंद साफसफाई न झाल्याने तशीच राहिली तर त्यातूनही फुफ्फुसांचे संसर्ग वाढतात. कबुतरांच्या विष्ठेतून बाहेर पडलेल्या सीरममधील न्यूमोनायट्रेसचा संसर्ग होऊन सतत थकवा येणे, झोप येणे, निरुत्साह वाटत असल्याच्याही तक्रारी वाढतात अशी माहिती फुफ्फुसविकार तज्ञ डॉ अभय उप्पे यांनी दिली.
कबुतरांच्या या त्रासामुळे दक्षिण अमेरिकेतील कोलंबियाची राजधानी असलेल्या बोगोटो शहरामध्ये, इटली मधील व्हेनिस शहरामध्ये तसेच ब्रिटनमधील काही शहरांमध्ये “कबुतरांना दाणे घालण्यास बंदी आहे. महाराष्ट्रात सुद्धा अनेक महानगरपालिकेने अशा प्रकारची बंदी घातली असली तरी त्याचे पालन होताना दिसत नाही”.