नवी मुंबईतील हॉटेल व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतीक्षेत

अनंतकुमार गवई
नवी मुंबई
नवीन नियमानुसार ५ ऑक्टोबर पासून सर्वत्र हॉटेल सुरू करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी देऊ केली. मात्र नवी मुंबईतील हॉटेल मालकांना नियमावलींबाबत संभ्रम असल्याने तसेच नागरिकांमध्येही कोरोनाविषयी अद्याप भीती असल्याने पहिल्याच दिवशी नवी मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांना अल्प प्रतिसाद लाभलेला पाहायला मिळाला.
कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे सहा महिन्यांपासून हॉटेल व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. हॉटेल व्यवसाय तातडीने सुरू न केल्यास भविष्यात राज्यातील ४० टक्के हॉटेल बंद पडतील अशी भितीही वर्तवण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यवसायिकांनी राज्य सरकारला केलेल्या विनंतीची दखल घेत राज्य सरकारने ‘अनलॉक ५’मध्ये हॉटेल व्यवसायिकांना नियमावलीच्या आधारे हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली. नियमावलीमध्ये हॉटेलमधील टेबल, खुर्ची वारंवार सॅनिटाईज करणे, दोन टेबलमधील अंतर, कॉन्टक्ट ट्रेसिंग तपासणे याची तयारी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ग्राहकांना उत्तम आणि सुरक्षित अन्न पुरवणे गरजेचे आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये अनेक कर्मचारी आपल्या गावी गेले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही.
परिणामी ग्राहकांना सुविधा पुरवण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सहा महिन्यांपासून हॉटेल बंद असल्याने थकलेले जागेचे भाडे, कर्मचार्यांचे वेतन, साहित्य खरेदीसाठी पुरेसा निधी नसल्याने अनेक हॉटेल व्यवसायिकांनी ५ ऑक्टोबरला हॉटेल सुरू करण्याचे टाळले आहे. त्यामुळे हॉटेल सुरू करण्यास परवानगी मिळाली तरी अनेक व्यावसायिकांनी मात्र थोडे थांबणेच पसंत केले आहे तर दुसरीकडे हॉटेल व्यावसायिकांसमोर असलेल्या विविध समस्येमुळे पहिल्या दिवशी नवी मुंबईतील फक्त ३० टक्केच हॉटेल सुरू झाले आहेत. उर्वरित ३० टक्के हॉटेल हे येत्या १५ दिवसांमध्ये सुरू होतील असा आशावाद काही हॉटेल व्यावसायिकांनी वर्तविला आहे.
“५ ऑक्टोबरपासून अटी व शर्थींअंतर्गत हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी आता ग्राहकांचा विश्वास संपादन करणे हे आमच्या समोर मोठे आव्हान आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सुरक्षित, स्वच्छ अन्न हॉटेलकडून पुरवले जात आहे. त्यासाठी हॉटेल कर्मचार्यांकडून योग्य काळजी घेण्यात येत आहे. हॉटेलमधील कर्मचारी, शेफ, वेटर हे कोरोनामुक्त आहेत. ही बाब ग्राहकांना दाखवून देत त्यांचा विश्वास संपादन करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली असल्याचे वाशी कॅफे पाम, हॉटेल व्यावसायिक – निकुंज सावला यांनी सांगितले”.