सहा महिने बंद असणारी वाचनालये खुली करा -माजी सभापती नवीन गवतेंची मागणी

अनंतकुमार गवई
नवी मुंबई, प्रतिनिधी
कोरोनाच्या सहा महिन्याच्या लढ्यानंतर नवी मुंबई शहरात रुग्णांची संख्या कमी होत असेल जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. नवी मुंबईत महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेली वाचनालये सुरू करून स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आपल्या हक्काचे दालन सुरू करून द्यावे, अशी मागणी नवी मुंबई महानगरपालिका स्थायी समितीचे माजी सभापती नवीन गवते यांनी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेऊन केली आहे.
कोरोनाचे संकट हळूहळू दूर होत असल्याने त्यातच नियम पाळून इतर व्यवसायिक क्षेत्र सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या अभ्यासात कोणताही खंड पडू नये यासाठी सोशल डिस्टिंगची नियमावली लागू करीत वाचनालये सुरू करण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आल्याचे माजी सभापती गवते यांनी सांगितले.
नवी मुंबई महापालिकेने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी त्यांना अभ्यास करण्याच्या अनुषंगाने दिघा ते बेलापूर पट्ट्यात असणाऱ्या ९ नोडमध्ये वाचनालये उभारली आहेत. यूपीएससी एमपीएससी या स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणारे विद्यार्थी आणि शालेय विद्यार्थ्यांपासून ते वाचन प्रिय नागरिकांसाठी ही वाचनालये आपल्या हक्काचे व्यासपीठ बनले आहे. दिघा परिसरातील झोपडपट्टी भागात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील येथील वाचनालय एक प्रकारे अभ्यास केंद्र बनले आहे. कोरोनामुळे पालिकेने शहरातील सर्व वाचनालय सहा महिन्यापासून बंद ठेवली आहेत वाचनालय बंद असल्याने त्यातच लॉकडाऊनच्या कालावधीत घरातील सर्व सदस्य असल्याने पुर्या जागेत अभ्यास कसा करायचा? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.