खुल्या ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत इराणचा फिडे मास्टर शाहीन सादेह विजेता
अंकित क-हे
ग्रामीण प्रतिनिधी/ नया अंदूरा
बाळापूर तालूक्यातील ग्राम कारंजा (रम) येथील रहिवासी असलेल्या पवन राठी चेस अकॅडमी आणि मस्तान चेस वर्ल्ड १९७८ आंध्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने दीपावली व बालदिन निमित्त आयोजित केल्या गेलेल्या १०,००० रुपयांच्या ऑनलाइन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये भारतासह अर्जेंटिना, जॉर्जिया, इराण, युक्रेन, अर्मेनिया, पाकिस्तान, रशिया, उज्बेकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका यासह २२ देशातील ग्रॅंडमास्टर्स, वुमन ग्रॅंडमास्टर्स, आंतरराष्ट्रीयमास्टर्स, फिडेमास्टर्ससह एकूण २२९१ खेळाडू सहभागी झाले होते त्यामध्ये इराणचा फिडे मास्टर शाहीन सादेह याने ५६ गुणांसह विजेतेपद पटकावले.युक्रेनचा मानांकित खेळाडू स्टेल्माशेंको पावले हा ५३ गुणांसह उपविजेता ठरला दिल्लीचा फिडेमास्टर आर्यन वार्षाणे याला ५० गुणांसह तृतीय स्थान मिळाले. अझरबैजान चा ग्रँडमास्टर वूगार रासलोव आणि उज्बेकिस्तान चा ग्रँडमास्टर सिंड्रोव्ह जावोहीर यांना ४९ गुणांसह चौथ्या आणि पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले तसेच अफगाणिस्तानचा फिडेमास्टर समीर सहिदी, भारताचा ग्रँडमास्टर आर आर लक्ष्मण आणि मंगोलियाचा फिडेमास्टर एनखबत्तर एनखणार यांना ४७ गुणांसह अनुक्रमे सहावे, सातवे आणि आठवे स्थान प्राप्त झाले. रशियाचा ग्रँडमास्टर आर्तुर, अजरबैजान चा आंतरराष्ट्रीय मास्टर मुराद अली आणि आणि इराणचा ग्रँड मास्टर मसूद यांना ४४ गुणांसह अनुक्रमे नववे दहावे आणि अकरावे प्राप्त झालेअकोला जिल्ह्यातील पहिले अरेना आंतरराष्ट्रीय मास्टर आणि पी आर चेस अकॅडमीचे संस्थापक आंतरराष्ट्रीय फिडे पंच पवन राठी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तसेच शार्दुल तपासे (सातारा), राहुल जोशी (ठाणे), दीपक वायचळ (सांगली) आणि पुरोहित चेस अकॅडमी (सांगली) चे प्रशिक्षक श्रेयस पुरोहित यांनी अँटीचीटिंग चे काम पाहिले.











