ताज्या घडामोडी

लातूर महानगरपालिका लगतच्या १५ किमी परिघातील गावांमध्ये शहर बस वाहतूक सेवेचा विस्तार करणार – पालकमंत्री अमित देशमुख

मुंबई दि. 16: लातूर महानगरपालिकेमधील शहर वाहतुक बससेवेचा लाभ लगतच्या गावातील विद्यार्थी व नागरिकांना अधिकाधिक मिळावा, महिला व विद्यार्थिनींना मोफत बससेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी लातूर महानगरपालिका लगतच्या 15 की.मी परिघातील गावांमध्ये शहर बस वाहतूक सेवेचा विस्तार करणार असल्याची माहिती लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.

लातूरमध्ये महानगरपालिकेमार्फत बस सेवेचा विस्तार करण्यासंदर्भातील बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस लातूर महानगरपालिकेचे पदाधिकारी यांच्यासह एस.टी.महामंडळाच्या प्रतिनिधी श्रीमती जोशी, एस.टी.महामंडळाचे लातूर विभाग नियंत्रक यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, शासकीय परिवहन सेवेचा लाभ अनेक लोकांना होत असल्याने नियमितपणे सिटी बस सेवा सुरु ठेवणे आवश्यक आहे. गावांतून अनेक नागरिक आपापल्या कामांसाठी बसने प्रवास करीत असतात हे लक्षात घेऊन लातूरमध्ये सद्या सुरु असलेल्या सेवा पूर्ववत राहाव्यात. यासह ज्या गावांमध्ये छोटे रस्ते आहेत अशा ठिकाणी मिनी बसेसची सुविधा उपलब्ध व्हावी. विद्यार्थी, नागरिक यांना बसेसचा अधिकाधिक लाभ मिळावा. मुली आणि महिलांसाठी मोफत बससेवा उपलब्ध व्हावी अशा सूचना करून यासंबंधी आराखडा सादर करण्याचे निर्देश श्री.देशमुख यांनी बैठकी दरम्यान दिले.
लातूरमधील सर्व नागरिकांसाठी दळणवळणाचे माध्यम अधिक सुकर व्हावे यासाठी लातूर महानगरपालिका लगतच्या १५ की.मी परिघातील गावांसाठी शहर बस वाहतूक सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे. यासाठी एसटी महामंडळाची परवानगी आवश्यक असून त्यास तत्वतः मान्यता प्राप्त आहे. यांतर्गत महामार्ग (हायवे) लगतचे गाव सोडून जिथे एसटी बससेवा उपलब्ध नाही अशा लातूर महानगरपालिका लगतच्या 15 की.मी परिघातील गावांमध्ये शहर बस वाहतूक सेवेचा विस्तार करण्यास एस. टी महामंडळाद्वारे मान्यता प्राप्त असल्याचे श्री.देशमुख यांनी स्पष्ट केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: