पातूर येथे जागतिक वन्यजीव दिवस साजरा

अविनाश पोहरे – संपादक
दि. 3 मार्च 2020 आज जागतिक वन्यजीव दिवसानिमित्त पातुर व आलेगाव वनपरिक्षेत्र कार्यालय , अकोला वनविभाग, प्राणीशास्त्र विभाग महात्मा फुले महाविद्यालय पातुर व निसर्ग कट्टा तर्फे बिबट्यापासून खबरदारीचे उपाय या विषयावर पातुर वनपरिक्षेत्र व आलेगाव परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सर्व गावकऱ्यांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी बिबट्यापासून स्वतःचे रक्षण कसे करावे या विषयाचे पोम्प्लेट स्वरूपात व फ्लेक्स च्या स्वरूपात अनावरण करण्यात आले. मानव-वन्यजीव संघर्ष हा सध्या पातुर बाळापुर व आलेगाव वनपरिक्षेत्र परिसरामध्ये सध्या काळजीचा विषय झालेला आहे. शेतकऱ्यांना किंवा गावकऱ्यांना त्यांचे काम करत असताना जर कुठला वन्यजीव दिसला तर लगेचच काय उपाय योजना करावी व कसे याबाबत सदर पोम्प्लेट मध्ये माहिती देण्यात आलेली आहे जेणेकरून कुठल्याही शेतकऱ्याला व गावकऱ्यांना कुठलीही इजा पोहोचणार नाही. सदर कार्यक्रमात धीरज मदने वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी मानव-वन्यजीव संघर्ष कसा कमी करता येईल या विषयावर सखोल मार्गदर्शन केले व सदर पोम्प्लेट ची इ-कॉपी सर्व गावकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात आली. पातुर आलेगाव वनपरिक्षेत्रात येणाऱ्या जंगला नजीकच्या गावांमध्ये फ्लेक्स च्या स्वरूपात व पोम्प्लेट च्या स्वरूपात ही माहिती गावकऱ्यांकरिता प्रसिद्ध करण्यात येईल असे श्री धीरज मदने यांनी सांगितले. पोम्प्लेट ची संकल्पना व मांडणी निसर्ग कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष श्री अमोल सावंत यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निसर्ग कट्ट्याचे सदस्य डॉ. मिलिंद शिरभाते सहाय्यक प्राध्यापक प्राणीशास्त्र विभाग शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला यांनी केले. कार्यक्रमाला महात्मा फुले महाविद्यालय येथील प्राणीशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. अमृता शिरभाते, प्रा. रोशनी लोमटे, श्री अविनाश घुगे वनरक्षक, वनपाल कु. धर्माळे ,महेश वानी, वनरक्षक श्री. संजू पाठक सर्व वनविभागाचे कर्मचारीव इतर वन अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.