पातूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त पुस्तके भेट देऊन महिलांचा सन्मान

द प्रोफेशनल करिअर अकॅडमीचा सामाजिक व वैचारिक अभिनव उपक्रम
अमोल करवते / ब्युरो चिफ
पातूर येथील स्थानिक सुप्रसिद्ध संस्था द प्रोफेशनल करिअर अकॅडमीच्या वतीने संस्थाध्यक्ष पंकज पोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनानिमित्त मौल्यवान पुस्तके व मास्क चे वाटप करून कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला.
शून्यातून विश्व् निर्माण करणाऱ्या महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. देवानेही ज्यांचे हक्क व अधिकारापासून दूर ठेवले तेच अधिकार एका भारतीय राज्यघटनेने बहाल केले. म्हणून आज महिला विविध क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतांना दिसत आहेत. एवढंच नाही तर राष्ट्रपती, पंतप्रधान होता आले.
सदर कार्यक्रम पातूर तालुक्यातील तेजस्विनी हळद प्रक्रिया ला भेट देऊन घेण्यात आला. या माध्यमातून विविध महिलांना रोजगार निर्माण झाला. सदर कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.व महिलांनी आपले विचार मांडले. यांनतर विशेष पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला. या पुस्तकामध्ये विविध लेखिकाचे पुस्तके देण्यात आले. लेखिका सौ. रंजना उन्हाळे यांचे स्रोत सुमनांजली, लेखिका लक्ष्मीबाई टिळक यांचे स्मृतीचित्र, लेखिका मंदाकिनी गोगटे यांचे घरोघरी गांधीजी, साने गुरुजी लिखित भारतीय नारी इत्यादी मौल्यवान साहित्य पुस्तके कर्तबगार महिलांना देण्यात आली.
सदर कार्यक्रमामध्ये तेजस्विनी हळद केंद्राला भेट देऊन त्यात तयार होणाऱ्या विविध हळद, तिखट पावडर, मसाला, धने पावडर, पापड, कुरड्या, ढोकळा पीठ, इडली पीठ याची विशेष दखल घेऊन आलू चिप्स मशीन मिळवून देण्याचे आश्वासन संस्थाध्यक्ष पंकज पोहरे यांनी दिले.
सदर कार्यक्रमामध्ये कर्तबगार महिला भारतीताई गाडगे, करुणा विठोबा गवई, मीनाक्षी किशोर यादव, नम्रता राहूल गाडगे, प्रिया अमोल तेलगोटे, दुर्गा सतीश सिरसाट इत्यादी महिला उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रम कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन व मास्क,सोशल डिस्टन्स चे पालन करून घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थाध्यक्ष पंकज पोहरे यांनी केले. यावेळी अविनाश पोहरे,पवन तांबे उपस्थित होते. तर आभार भारतीताई गाडगे यांनी केले.