ताज्या घडामोडी

बोगस बियाणे विक्री केल्यास शासन कठोर पावले उचलणार – कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम

मुंबई दि. 03 : राज्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री संबंधातील वाढत्या तक्रारी ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून याबाबत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संबधित कंपन्यावर गुन्हे दाखल केले जातील, असे कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत सांगितले.

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या रब्बी हंगामात एका कंपनीमार्फत सप्टेंबर, 2020 कालावधीत सुमारे 8 टन कांदा बियाणे खरेदी केले होते.  मात्र या कांदा बियाण्यांची उगवण न झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. याबाबत निवेदनाद्वारे संबंधित शेतकऱ्यांनी कृषी राज्यमंत्री डॉ. कदम यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन राज्यमंत्री डॉ. कदम यांनी संबंधित विभागाचे अधिकारी, शेतकरी व कंपनीचे प्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक घेतली.

कृषी राज्यमंत्री डॉ. कदम म्हणाले की, शेतकऱ्यांना गेल्या काही काळापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. याबरोबरच काही कंपन्या जर शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करत असतील तर कृषी विभागाच्या वतीने अशांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांनीही काळजी घ्यावी. सातारा जिल्ह्यातील बोगस बियाणे विक्रीबाबत सविस्तर माहिती कृषी आयुक्त यांनी घेऊन कृषी विभागाच्या वतीने या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, अशी सूचनाही डॉ कदम यांनी केल्या.

बैठकीला कृषी सचिव श्री. एकनाथ डवले तसेच सह सचिव श्री. वी.बी पाटील,  संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) श्री. दिलीप झेंडे, अवर सचिव श्री. उमेश आहिर तसेच शेतकऱ्यांचे प्रतिनिधी श्री.विराज शिंदे, संभाजी भोईटे, राजेंद्र कदम, विद्याधर धुमाळ आदींसह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: