महाराष्ट्रातील रक्त तुटवडा लक्षात घेता तेरणा ब्लड बँकेतर्फे रक्तदान करण्याचे नागरिकांना आवाहन

अनंतकुमार गवई मुंबई
एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी रक्त हा घटक किती महत्वाचा आहे याची सर्वांनाच जाणीव असली तरी राज्यातील सुमारे ३४४ ब्लड बँकांमध्ये काही दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे. कोरोनामुळे महाविद्यालये बंद आहेत. खासगी कंपन्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे आणि सोशल डिस्टंसिंगच्या मर्यादेमुळे रक्तदान शिबीरे आयोजित करण्यावर मर्यादा येत आहेत. या सर्व कारणांमुळे रक्तदान कमी होत आहे. महाराष्ट्र राज्य देशात रक्त संकलानात अग्रेसर होते परंतु कोरोना महामारीमुळे रक्तटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रक्तदान करणे हाच एक पर्याय असल्यामुळे नवी मुंबईतील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर यांच्या तेरणा ब्लड बँकेने नवी मुंबईतील नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. तेरणा ब्लड बँकेने ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन निमित्त महा रक्तदान शिबीराचे आयोजन नेरुळ नवी मुंबई श्री गावदेवी माता मंदिर सेक्टर १२ येथे करण्यात आले होते. यावेळी जवळ पास ३० नागरिकांनी रक्तदान केले. यावेळी प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र देण्यात आले. १३ डिसेंबर रोजी घणसोली येथे कै बाळाजी आंबो पाटील, शाळा क्रमांक ४२ येथे नगरसेवक घनःश्याम मढवी मित्र मंडळ इथे सकाळी १० ते ३ या वेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, तसेच नेरुळ येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महाराज कंत दर्शन दरबार, सेक्टर ६ मध्ये सकाळी १० ते २ या वेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. रक्त तयार करता येत नाही आणि संकलन केलेले रक्त दीर्घकाळ साठवता येत नाही त्यामुळे सातत्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आवश्यक असून नवी मुंबईतील सामाजिक संस्थांनी तसेच रहिवाशी संघटनांनी रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्याचे आवाहन तेरणा ब्लड बँकेतर्फे करण्यात आले आहे. कोरोना संसर्गाच्या कालावधीमध्ये राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णालयांच्या रक्तपेढ्यांमध्ये पुरेशा प्रमाणांमध्ये रक्त उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक रक्ताच्या शोधात वणवण फिरत आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी राज्यातील राजकीय, धार्मिक, सामाजिक संस्था व गृहनिर्माण सोसायटी यांनी कोरोनाविषयक काळजी घेऊन छोट्या-छोट्या रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे. स्वैच्छिक रक्तदात्यांनी देखील नजीकच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांमार्फत आवश्यक त्या तपासणी चाचण्या व प्रतिबंधक उपाययोजना करुन तेरणा ब्लड बँक रक्त संकलन करणार आहे.