आरोग्य समस्या सोडविण्यासाठी आयुक्तांना निवेदन सादर

अनंतकुमार गवई
नवी मुंबई :
स्वच्छ शहराची बिरुदावली मिरवणाऱ्या नवी मुंबई महानगर पालिकेचे सेकटर 44 येथील मार्केट अस्वच्छतेच्या गर्तेत अडकले आहे. मार्केटमध्ये सर्वत्र पसरलेला कचरा, सांडपाणी यामुळे मार्केटमध्येच नाही तर परिसरातही मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव वाढला असून आरोग्याच्या समस्याही उदभवण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. नेरुळ सेकटर 44 येथील भूखंड क्रमांक 160 वर नवी मुंबई महानगर पालिकेने मार्केट उभारले आहे. या मार्केट मधील अंतर्गत गाळे रिक्त असले तरी बाहेर गाळ्यां मध्ये व्यवसाय सुरू आहे. मात्र मार्केट उभारण्या पलीकडे त्याच्या स्वच्छतेकडे पालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले दिसते. येथील अस्वच्छतेबाबत परिसरात राहणाऱ्या नागरिकां कडून अनेक तक्रारी परिवहन समिती सदस्य, शिवसेना सिवूडस विभागप्रमुख समीर बागवान व जस्मीन बागवान यांच्याकडे येत होत्या. याबाबत समीर बागवान यांनी सांगितले की, या मार्केटची पाहणी केली असता शौचालय, टेरेस, पाण्याची टाकीची पुरती दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी कचरा आणि दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे.मार्केट मधील शौचालय वापरण्यायोग्य राहिले नसल्याने तसेच पिण्याच्या पाण्याचीही सोय नसल्याने येथील दुकानदारांना पिण्याच्या पाण्यासाठी वा मलमूत्र विसर्जनासाठी शेजारील इमारतीत जावे लागत आहे. येथील पाण्याच्या टाकीवर झाकण नसल्याने त्यात कचऱ्याचा खच झाला आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
त्यामुळे तेथील अस्वच्छतेकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना करण्याकरता शिवसेना उपशहरप्रमुख सुमित्र कडू,परिवहन समिती सदस्य तथा शिवसेना सिवूडस विभागप्रमुख समीर बागवान, शाखाप्रमुख जितेंद्र कोंडस्कर, जस्मीन बागवान, कलावती चव्हाण, युवा सेना अधिकारी केदार बनसोडे यांनी महानगर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची गुरुवारी भेट घेतली. तसेच त्यांना परिसरातील नागरिकांच्या सह्या असलेले निवेदनही दिले. यावेळी संबंधित विभागांना स्वच्छता, देखभाल, दुरूस्ती बाबत तातडीने सूचना देण्याची विनंती समीर बागवान यांनी केली.