अनुचित घटना होण्याआधी तुर्भे विभाग कार्यालयाची वास्तु जमीनदोस्त करा

- भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांचे निवेदन
अनंतकुमार गवई
नवी मुंबई, प्रतिनिधी
नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयाच्या नूतनीकरणाचे काम महानगरपालिकेने हाती घेतले आहे. मात्र या इमारतीचे कॉलम निकामी (क्रॅक) झाल्याने सदर दुरुस्तीचे काम थांबवण्यात आले आहे. जुन्या इमारतीचे कॉलमच निकामी झाल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असणारी तुर्भे विभाग कार्यालयाची इमारत ढासळू शकते ही बाब लक्षात घेता कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी कार्यालयाची वास्तू पाडून लवकरात लवकर त्याचे बांधकाम सुरू करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपाचे गटनेते रामचंद्र घरत यांनी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेऊन केली आहे याबाबत लोकनेते आमदार गणेश नाईक यांना देखील निवेदन देण्यात आले आहे.
महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयाच्या इमारतीमधून तुर्भे प्रशासकीय विभागाचे कामकाज चालते. या इमारतीची वास्तु जीर्ण झाल्याने तुर्भे विभाग कार्यालयात मॉड्युलर फर्निचर पुरविणे, वॉटर प्रुफिंग करणे, सोलिंग करणे, पीसीसी करणे, ग्रील बसविणे, दगडी विटांचे बांधकाम करणे, प्लास्टर करणे, पाणीपुरवठा व सॅनिटरीची सुविधा पुरविणे, दिव्यांग व्यक्तींकरिता लिफ्ट बसविणे आदी कामे करण्यास नवी मुंबई महानगरपालिकेने 2018 मध्ये स्थायी समितीने मंजुरी दिली होती. या कामासाठी एक कोटी वीस लाख रुपये खर्च करून ही कामे करण्याची तरदूत करण्यात आली आहेत.
“तुर्भे विभाग कार्यालयाच्या रिपेरिंगचे काम करत असताना इमारतीचे कॉलम निकामी झाल्याने दोन वर्षापासुन काम बंद आहे. मी स्वत: जाऊन त्याची पाहणी केली असता कॉलम निकामी झाल्याने ही इमारत कधीही कोसळु शकते, असे निदर्शनास आले. तिथे लोकांचा वावर खुप असल्याने त्यांच्या जीवाला खुप धोका पोचू शकतो त्यामुळे सदरची इमारत पालिकेने लवकरात लवकर पाडण्यात यावी अशी मागणी केल्याचे
भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष
- रामचंद्र घरत यांनी केली आहे “.