“डर का माहोल दूर” करण्यासाठी सिनिअर सिटीझन हेल्थकेअर फाउंडेशन ऐरोली संस्थेकडून योग शिबिराचे आयोजन

अनंतकुमार गवई
नवी मुंबई, प्रतिनिधी
लॉक डाऊन काळात सर्वात जास्त कोंडमारा कोणाचा झाला असेल तर तो बालकांचा व ज्येष्ठ नागरिकांचा.
जनजीवन बऱ्यापैकी सुरळीत होत असताना ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिकतेचा विचार करून, घरच्यांच्या काळजी पोटी घरात अडकून पडलेल्या ज्येष्ठांना मोकळा स्वास घेण्याची त्यांची भीती दूर करण्याची नितांत गरज होती. याचाच विचार करून सीनिअर सिटीझन हेल्थकेअर फाउंडेशन ऐरोली व पतंजली योगपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने २८/१०/२०२० ते १/११/२०२० पर्यंत पांच दिवसांचे जेष्ठ नागरिकांसाठी योग प्रशिक्षण शिबीर दिवंगत काळू राघो सोणवने उद्यान सेक्टर चार ऐरोली येथे आयोजित करण्यात आले होते.
या प्रशिक्षण शिबीराचा मुख्य उद्देश शास्त्रशुध्द पध्दतीने योगाभ्यास करून सर्वांचे आरोग्य चांगलं करणे हा होता.
गेले ८-१० महिण्यापासून बहुतेक सर्व नागरिक कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून, महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडत नव्हते जास्तीत जास्त वेळ घरामध्ये राहिल्याने ज्येष्ठांना बरोबरच इतर नागरिकांमध्ये सुध्दा आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ लागल्या होत्या. सर्वांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी, “सिनिअर सिटीझन हेल्थकेअर फाउंडेशन” या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी योग शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेतला. तद्नंतर संस्थेचे अध्यक्ष श्री बबनराव पाटणकर साहेब यांनी ऐरोली मधील पतंजलीच्या योग शिक्षीका सुनीता ताई यांना जेष्ठ नागरिकांना योग प्रशिक्षण देणे बाबत विनंती केली असता त्यांनी सहमती दर्शवली.
सुनीताताई ह्या महीला पतंजली मुंबई प्रांतच्या राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत.त्यांनी मुंबई विद्यापीठातून योगतत्वज्ञान या विषयात पदवी प्राप्त केलेली असून त्यांनी प्राकृतिक चिकित्सा परीषद बोर्ड दिल्ली येथून निसर्गोपचार तज्ञ ही पदवी सुध्दा प्राप्त केली आहे. पतंजली च्या योग शिक्षीका सुनीताताई उच्च शिक्षीत असल्याने त्यांनी जेष्ठ नागरिकांना पांच दिवसांच्या योग प्रशिक्षण शिबीरामध्ये अतीशय चांगले व सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले आहे.तसेच ज्येष्ठांना भेडसावणाऱ्या वेगवेगळ्या आजारांवर कोणकोणते निसर्गोपचार करणे गरजेचे आहेत याविषयी उपयुक्त माहिती दिली. या प्रसंगी समाजसेवक अंकुश सोनवणे, शांताराम विशे, नंदकिशोर भारती, देवराम शिंदे तसेच सौ. शिंदे, सौ.काळे या महिलांनी शिबीरामुळे, खुप फायदा झाला असल्याची भावना आपल्या प्रतिक्रियेद्वारे व्यक्त केल्या.
तर योगशिक्षीका सुनीताताई यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, “सध्याच्या बिकट परिस्थिवर मात करून ज्येष्ठांनी प्रथमच या उद्यानात येऊन चांगल्या प्रकारे योगाभ्यास केला आहे. तसेच या ज्येष्ठांचा उत्साह ऐवढा दांडगा आहे की, सिनिअर सिटीझन हेल्थकेअर फाउंडेशन या संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य हे जेष्ठ नागरिक नसून ते जेष्ठ युवा आहेत” असे नमूद करून, ऐरोली परीसरातील सर्व युवक व युवतींनी त्यांचा आदर्श घ्यावा असे मत व्यक्त केले. तसेच ‘करा योग पळवा रोग’ हा आरोग्य मंत्र दिला. तद्नंतर संस्थेचे अध्यक्ष बबनराव पाटणकर साहेब यांनी, सिनिअर सिटीझन हेल्थकेअर फाउंडेशन या आमच्यासंस्थेचा उद्देशच मुळी, जेष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा असल्यानेे, सर्व सभासदांचे व परिसरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी या शिबिराचे आयोजन केल्याचे मत व्यक्त करून संस्थेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती दिली.
सदर योग प्रशिक्षण शिबीरास ६०-७० ज्येष्ठ नागरिकांना सोबत परिसरातील इतर नागरिकांनी देखील दररोज हजेरी लाऊन या शिबिराचा लाभ घेतला. हे शिबिर आयोजित करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी भारत म्हात्रे, महादेव इंगळे, किसन चित्ते, विजय जेना, देविदास सपकाळ, शिवराम भोसले यांनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संस्थेचे सचिव संजय जाधव यांनी तर आभार प्रदर्शन खजीनदार शांताराम विशे यांनी केले.