बाभळी शिवारामध्ये शेतरस्त्याची दुरावस्था

गणेश बळकर
ग्रामीण प्रतिनिधी/बाभुळगाव
पातुर तालुक्यातील बाभूळगाव येथे बाभळी शिवारामध्ये शेतरस्ता खराब असल्यामुळे शेतकऱ्यांचे खुप हाल होत आहेत.यावर्षी बऱ्याच प्रमाणात पाऊस झाल्यामुळे बाभळी शिवारातील शेतरस्ता खुप खराब झाला आहे.पावसामुळे रस्त्यावर चिखलाने आपले साम्राज्य निर्माण केले आहे.बाभळी शिवारामध्ये रस्त्याचा विषय हा दरवर्षी शेतकऱ्यासाठी डोकेदुखी ठरतोय.कारण या शिवारामध्ये दरवर्षी शेतकऱ्यांना शेतरस्ता खराब असल्यामुळे शेतात पेरणीसाठी,शेतातील इतर काम करण्यासाठी, शेतातील पीक घरी आणण्यासाठी कधीकधी या शिवारातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे रहातात. पावसाचा भरोसा नाही,शेतीवर आधारित जीवन असल्यामुळे शेतकरी वर्ग फार चिंतेत आहे.सोयाबीन काढणीसाठी शेवटी सोयाबीनचे कुटार चिखलामध्ये टाकावे लागले.ज्याप्रमाणे देशाच्या विकासामध्ये देशातील रस्ते महत्त्वाची भूमिका पार पाडतात.त्याप्रमाणे शेतीचा विकास करायचा असेल,शेतकऱ्यांचा विकास साधायचा असेल तर शेतमालाच्या भावाप्रमाणे शेतीला रस्ता असणे तितकेच महत्त्वाचे आहे.शासनाने याविषयी विचार करावा अशी मागणी या शिवारातील शेतकरी करीत आहेत.