मालमत्ता कराच्या व्याजावर पालिका देणार सवलत खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्याला यश

अनंतकुमार गवई
नवी मुंबई, प्रतिनिधी –
कोरोना महामारीमुळे अनेक नागरिकांचे उत्पन्न थांबल्यामुळे ते आर्थीक अडचणीत आले आहेत. या परिस्थितीत मालमत्ता कराच्या व्याजाचा बोजा त्यांच्यावर टाकला तर ते आणखी अडचणीत येतील. त्यामुळे महापालिका प्रशासनाने मालमत्ताकरावरील व्याज त्यांच्याकडून घेऊ नये, अशी मागणी शिवसेना खासदार राजन विचारे यांनी केल्यानंतर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी अभय योजना पुन्हा राबविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.या योजनेमुळे हजारो मालमत्ताकर धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आर्थीक अडचणीत असलेल्या मालमत्ताकर धारकांना महापालिकेकडून सवलत मिळावी यासाठी खासदार राजन विचारे यांनी अभिजित बांगर यांनी भेट घेतली आणि त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे अनेक रोजगार आणि व्यावसाय बुडाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड आर्थीक ताण पडला आहे. जर या परिस्थितीमध्ये महापालिकेने त्यांच्याकडे मालमत्ता करासाठी तगादा लावला तर ते आणखी अडचणीत येतील. त्यामुळे त्यांना दिलासा देणारी एखादी योजना प्रशासनाने तयार करावी, अशी मागणी यावेळी विचारे यांनी केली. त्यावर तातडीने निर्णय घेऊन अभय योजना पुन्हा आणण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.