कोरोना नियोजनाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य पथक चंद्रपूरात दाखल

आरटीपीसीआर तपासण्या व कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणात वाढविण्यावर भर देण्याचे निर्देश
केंद्रीय आरोग्य पथकाने केली लसीकरण केंद्राची पाहणी
प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या आवश्यक सूचना
चंद्रपूर दि.10 एप्रिल : कोरोना विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्या देखील वाढत आहे हा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात आरटीपीसीआर तपासण्या मोठ्या प्रमाणात वाढवाव्यात अशा सूचना केंद्रीय आरोग्य पथकाने जिल्हा प्रशासनाला दिल्या.
चंद्रपूर महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रशासनाच्या कोरोना नियोजनाची पाहणी व केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक चंद्रपुरात दाखल झाले आहे.
दोन सदस्यीय पथकात एम्स, जोधपुरचे डॉ.निशांत चव्हाण यांच्यासह उपसंचालक, एनसिडीसी,दिल्लीचे डॉ. जयकरण यांचा समावेश आहे.
जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या कोरोना विषयक उपाययोजनांची केंद्रीय पथकाने प्रशंसा केली. तसेच आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्यासाठी मायक्रोबायोलॉजीस्ट व मनुष्यबळ वाढविण्याच्या सूचना देतानाच कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणात वाढविण्यासही सांगितले. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचा मृत्यू होतो, त्यासाठी शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासणीसाठी पल्स ऑक्सीमिटर वाटपाचे निर्देशही केंद्रीय पथकाने दिलेत.
यावेळी केंद्रीय आरोग्य पथकाकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील लसीकरण केंद्राची पाहणी करण्यात आली. जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेची माहिती त्यांनी जाणून घेतली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कोरोना संसर्गाची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्तकतेने उपाययोजना राबवत असल्याची माहिती. तसेच आरटीपीसीआर चाचण्यांही जिल्ह्यात सुरु असून रुग्णांचे वेळेत निदान होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगून श्री. गुल्हाने यांनी जिल्ह्यात पूरेशा प्रमाणात खाटांची व इतर अत्यावश्यक सुविधांची उपलब्धता ठेवण्यावर प्रामुख्यान भर देण्यात येत असल्याचे सांगितले.
जिल्ह्यात आढळणारे दैनंदिन पॉझिटिव्ह रुग्ण, होणारे मृत्यू, बरे झालेले रुग्ण व टेस्टिंग याबद्दलची माहिती सादर केली. तसेच तालुकानिहाय कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध बेडची माहिती, त्यासोबतच जिल्ह्यात माझे कुंटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेतंर्गत आयएलआय व सारी रुग्णांचे सर्वेक्षण तसेच घरोघरी जाऊन गृहभेटी देणे आरोग्य विभागामार्फत सुरू आहे.