प्रशासकीय सेवेत महाराष्ट्राची ध्वजा अभिमानाने उंचावत आहे – परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे माजी सचिव डॉ.ज्ञानेश्वर मुळे

महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत ‘प्रशासकीय सेवेतील मराठी माणूस’ या विषयावर डॉ. मुळे बोलत होते.
नवी दिल्ली, दि. २५ : देशात प्रशासकीय सेवांमध्ये मराठी अधिका-यांचा टक्का वाढत आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणांचा वारसा पुढे घेवून जात हे अधिकारी महाराष्ट्राची ध्वजा अभिमानाने उंचावत आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य तथा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे माजी सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी आज केले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे सातवे पुष्प गुंफताना ‘ प्रशासकीय सेवेतील मराठी माणूस’ या विषयावर डॉ. मुळे बोलत होते.
गेल्या काही दशकांमध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि द्वारकेपासून गुवाहाटीपर्यंत मराठी अधिकारी संपूर्ण देशभर कार्यरत आहेत. राजधानी दिल्लीतही विविध मंत्रालयात महत्वाच्या पदांवर मराठी अधिकारी महत्वपूर्ण कामगिरी करीत आहेत. केंद्र शासनानाच्या विविध आयोगांवर व संस्थांमध्येही महत्वाची पदे भूषवित आहेत. हे सर्व अधिकारी महाराष्ट्राचे राजदूत असून त्या-त्या राज्यात तसेच राजधानी दिल्ली मध्ये महाराष्ट्राचा प्रभाव पाडत आहेत, हे आश्वासक चित्र असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले.
देशाच्या प्रशासकीय सेवेत कार्यरत हे सर्व अधिकारी महाराष्ट्राचा सामाजिक,ऐतिहासिक, सांस्कृतिक, शैक्षणिक वारसा पुढे घेवून जाण्याचे कार्य जोमाने करीत आहेत. केंद्र सरकारमधील महाराष्ट्राच्या मंत्र्यांकडे कार्यरत मराठी अधिका-यांसह येथील एकूण ५३ मंत्रालयांच्या विविध विभागात आपल्या ज्ञानाची व कौशल्याची छाप या अधिका-यांनी सोडली आहे. दिल्लीमध्ये अशा २०० हून अधिक अधिका-यांनी एकत्र येत ‘पुढचे पाऊल’ ही संस्था स्थापन केली आहे. हे अधिकारी ‘खासदार मित्र’ ही संकल्पना दिल्लीत राबवित आहेत. बहुतांश अधिकारी आपल्या जबाबदा-या सांभाळून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेच्या तयारीसाठी येणा-या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना विविध मंचांच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत आहेत.