ताज्या घडामोडी

‘मुंबई आमची बालमित्रांची’ अभियानाचे उद्घाटन

मुंबई, दि. १८ : राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांनी मुंबई शहरास बाल कामगार बाल भिक्षेकरी, बालकांचे शोषण व रस्त्यावरील मुले या बालकांच्या समस्यांतून मुक्त करण्याबाबत अभियान राबविण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्हाधिकारी यांच्या दालनात ‘मुंबई आमची बाल मित्रांची’ या अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते झाले.

प्रतिकुल परिस्थितीमध्ये, असुरक्षित, हरवलेली आणि सापडलेली अशा मुलांच्या सुरक्षित भवितव्यासाठी मुंबई येथे मैत्रीपूर्ण ठिकाणे या अभियानाची सुरुवात करण्यात येत आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश मुंबई शहराला अशा मुलांसाठी मैत्रीपूर्ण ठिकाण बनविणे आहे, असे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी सांगितले.

ही मोहीम बाल कामगार, बालकांचे लैंगिक शोषण, भीक मागणे, असुरक्षित हरवलेली आणि सापडलेल्या मुलांसाठी मैत्रीपूर्ण ठिकाणे बनविणे व त्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या कामाची व्याप्ती वाढविणे यावर आधारित असल्याचे श्री.निवतकर यांनी सांगितले.

या अभियानाद्वारे मुंबई येथील पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, हाजी अली, सिध्दी विनायक मंदिर, सार्वजनिक उद्यान, रेल्वे स्टेशन, रस्ते त्या त्या विभागामध्ये रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी अशी मैत्रीपूर्ण ठिकाणे बनविण्यात येतील जेथे त्यांचे आरोग्य, शिक्षण, पौष्टिक आहार, समुपदेशन यांची सर्वांगीण काळजी घेण्यात येईल, तसेच हरवलेल्या मुलांच्या पालकांचा शोध घेवून त्यांना पुन्हा पालकांच्या ताब्यात देवून पुनर्वसन करण्यात येईल. अशा प्रकारे बालकांच्या सर्व हक्काचे संवर्धन करण्याचे प्रयोजन आहे, असे जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांनी सांगितले.

या अभियानाअंतर्गत पुढील सहा महिन्यात सोशल मीडियाव्दारे याविषयी जागरूकता निर्माण करणे, आरोग्य शिबीर घेणे, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक ठिकाणे येथे बचावकार्य राबविणे, सामान्य लोकांच्या माहितीसाठी बूथ उभारणे, कॉलेज ऑफ सोशल वर्कच्या विद्यार्थ्यांसह बाल कल्याण समिती, पोलीस, वॉर्ड समित्या, नगरसेवक यांच्यासाठी प्रशिक्षण घेणे यांचा सामावेश आहे.

मुंबईमध्ये अशा प्रकारच्या मुलांसोबत काम करणाऱ्या सर्व संबंधितांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या कामामध्ये जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, मुंबई शहर, समाज सेवा शाखा, मुंबई पोलीस, बाल आशा ट्रस्ट, आय.जी.एम. प्रेरणा, विधायक भारती, प्रथम, चाईल्ड लाईन इ. स्वयंसेवी संस्थाचा सहभाग असणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

ही मोहिम जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मुंबई शहर, श्रीमती प्रेमा घाटगे यांच्या अधिपत्याखाली सर्व संबंधित शासकीय विभाग व स्वयंसेवी संस्था यांचे समन्वयाने राबविण्यात येणार आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: