अमरावती, दि. 28 : डेल्टा प्लसचे आढळलेले रुग्ण, तिस-या लाटेची संभाव्यता आदी बाबी लक्षात घेऊन यंत्रणा सुसज्ज करतानाच अधिकाधिक लसीकरण होणे आवश्यक आहे. जलद लसीकरणासाठी अधिक मनुष्यबळ उपलब्ध करून घेऊन लसीकरणाची दैनिक क्षमता वाढविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, डॉ. रेवती साबळे आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यात लस उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. तथापि,
लसीकरणाचा विस्तार करणेही गरजेचे आहे. त्यासाठी अधिकाधिक मनुष्यबळ मिळवून प्रतिदिन क्षमता वाढवावी. जिल्ह्यात पहिल्या डोसचे 34 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. या प्रक्रियेचा वेग वाढविणे आवश्यक आहे. कोविडबाधितांची रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. मात्र, गाफील राहून चालणार नाही. औषधे, खाटा, ऑक्सिजन सुविधा आदी यंत्रणा सुसज्ज करण्याबरोबरच दक्षता नियमपालनाबाबत सातत्याने जनजागृती करावी. अचलपूर व अंजनगाव सुर्जी येथील उपजिल्हा रुग्णालयांतील अपेक्षित कामांसाठी आवश्यक निधी मिळण्यासाठी पाठपुरावा होणे गरजेचे आहे. त्यासाठी मुंबईत मंत्रालय स्तरावर बैठक घेतली जाईल. स्त्री रूग्णालयाच्या कामालाही वेग द्यावा. ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करण्यासाठी आवश्यक कामांचे प्रस्ताव द्यावेत. संभाव्य साथीच्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्रे खाटा, औषधे, ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व इतर यंत्रणेसह सुसज्ज ठेवावीत, असेही निर्देश त्यांनी दिले.डेल्टा प्लस रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध, आवश्यक उपचार व इतर बाबींचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला.